सकाळची प्रसन्न पवित्र वेळ, रामप्रहर मागे सरत होती, लाल किरमिजी रंगांची उधळण करीत काळ्या पांढऱ्या ढगांआडून सूर्यनारायण डोकावू लागला होता, निळ्या आसमंतातील अभ्रांना चंदेरी सोनेरी सूर्यप्रभा उजळत होती.
त्या भरजरी सोनेरी किरणांनी पर्वती ची शोभा खुलत होती, दूरवर सिंहगडाची क्षितिजे जणू शिवशौर्यगाथा गात होती, तळजाई आणि अरण्येश्वरीची वृक्षवल्लरी वायु लहरींसोबत हवेत गारवा भरीत होत्या.
पर्वतीरोहण आणि पर्वतीदर्शन करणाऱ्या सदाशिव, शनिवार नि नारायणपेठी पुणेकरांची वर्दळ आणि धावपळ सुरु झाली होती. शनिवारवाड्याची श्रीमंती सांगणाऱ्या गल्लोगल्लीतल्या मारुती-गणपती मंदिरातील घंटारव, टाळांची किणकिण आणि स्तोत्रपठणाचे पवित्र कर्णमधुर स्वर मानवी आसमंत जागवित होते. ओंकारेश्वराला अभिषेक करीत खळखळ वाहणाऱ्या मुळा-मुठा पुणेरी वैभवाचं गीत गात होत्या. पक्षांचं आनंददायी कूजन आणि किलबील त्या स्वरांना उत्तम संगीत साथ करीत होते.
रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या बग्गी आणि टांग्यांच्या घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज हवेत विरत होता आणि त्यासोबत मानवी जीवन व्यवहार गती घेऊ लागले होते.
ब्रह्ममुहूर्ती उठून शारीरिक आण्हिकं आणि त्यापाठोपाठ ध्यान प्राणायाम उरकून नित्याचं पठन वाचन करुन प्रभातीच्या आनंद विहारासाठी घराबाहेर पडलेले तसेच पर्वती आणि सारसबागेच्या तळ्यातल्या सिद्धिविनायकाचं दर्शन करुन परतलेले नाना सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणातील हिरव्यागार प्रफुल्लित बगीच्यात प्रसन्न मनाने येरझरा घालीत होते.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ या न्यायाने नानांनी स्वतःच्या देखरेखीखाली महाविद्यालयाच्या प्रांगणात फुलझाडे आणि वृक्षांची लागवड करवून सुंदर अशा बगीचाचे निर्माण केले होते. स्वतःच्या हातांनी पाणी आणि खत देऊन बगीचाचे संगोपन केले होते. त्या फुलझाडांवरील कळ्या आणि पाना-फुलांना हळुवारपणे कुरवाळीत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण गोड संवाद करीत होते नाना.
सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल झाल्यापासून नानांचा तो नित्यनेम होता. तो विहार होता नि व्यायाम होता, ती काळजी होती नि दक्षता होती याशिवाय ती कर्तव्यनिष्ठा होती नि जबाबदारी होती, डोळस व्यवस्थापन आणि भावपूर्ण कृतज्ञताही होती.
पांढरं स्वच्छ धोतर, तसाच सदरा, काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोक्यात घट्ट बसणारी उंच काळीभोर टोपी आणि ओठांना झाकणाऱ्या भरदार काळ्याभोर अंतर्वक्र मिशांनी शोभून उठून दिसणारा सदास्मित तेजपुंज तेजस्वी प्रसन्न चेहरा, बोलके पाणीदार काळेभोर डोळे, मध्यम देहयष्टीला साजेशी उंची. कोणाही अनाहूताला सहज आकर्षुन घेईल असं ते श्वेतवस्त्रधारी लोभस व्यक्तिमत्त्व त्या बगीच्याचं सौंदर्य खुलवीत होतं. नानांच्या त्या पवित्र प्रसन्न सहवासात त्या पुष्पलता सुगंध आणि नानाविध रंग घेऊन उमलत होत्या.
नानांच्या शिस्तप्रिय आणि करारी व्यक्तिमत्वाचा दबाव आणि प्रभाव होता पुणेरी जनमानसात. त्यांच्या त्या नित्यक्रमात अडथळा आणण्याची सहसा कुणाची हिंमत होत नसे. नू.म.वि. आणि स.प. चे कडक शिस्तीचे ‘प्रिन्सिपॉल सबनीस’ असा त्यांचा पुणे शहरात दरारा आणि परिचय होता. म्हणजे भीती होती असं नाही तर कमालीचा आदर होता विद्यार्थी अन् पालक वर्गात. आदरयुक्त भीती म्हणलं तरी काही वावगं होणार नाही.
तो प्रभाव आणि दरारा होता करारी शिक्षकी बाण्याचा, शिक्षणावरील अमूल्य श्रद्धा-निष्ठेचा, अनुभवसंपन्न समाजाभिमुख कार्यशैलीचा, नैतिक विचारांचा, आदरपूर्वक संवादाचा, उद्गामी ज्ञानाचा, अभ्यासू वृत्तीचा, कठोर तप-साधनेचा, स्वयंप्रेरित शिस्तीचा, परखडपणाचा, लक्षणीय ध्येय धोरणांचा, त्याग समर्पणाचा, निरपेक्ष निराकांक्षतेचा आणि चारित्र्यसंपन्न ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचा.
नानांच्या त्या भावपूर्ण संवादाने जणू त्या वृक्ष-वेली भाऊक झाल्या होत्या. होय ! डोळ्यांतील आसवं टिपित नाना त्यांच्याशी निर्वाणाच्या गप्पा करीत होते. त्या दिवशी तर नानाही भाऊक झाले होते.
त्यानंतर सहजच त्यांनी महाविद्यालयाच्या इमारतींकडं भावपूर्ण नजर वळवली. महाविद्यालयाची भव्य देखणी इमारत, वसतीगृह, ग्रंथालय, प्राचार्य कक्ष, त्या निश्चेतन भिंती आणि प्रांगणातील वृक्षवल्लरी… सारेच आपुलकीच्या नात्यात बांधलेले. जागा मिळवण्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहकाऱ्यांसोबत नित्याचं विहरणं आढावा घेणं सूचना करणं झालेलं. शि.प्र. मंडळींच्या योगाने त्यांनीच तर जन्माला घातलेली ती प्रिय बाळे होती. त्याच न्यायानं त्यांचं पोषण-संगोपनही केलं होतं. कधी त्यांच्याशी ते इतके लोलुप झाले होते कळलंच नव्हतं.
तीन वर्षे ! एखाद्या तपासारखा काळ लोटला होता. तपच होतं ते, अतिशय अल्प कालावधीत एखादं कॉलेज उभारुन विकास साधीत त्याला नावारूपाला आणणं काही साधं सोपं काम नव्हतं त्याकाळी. कठोर साधना केली होती नानांनी त्यास्तव.
सहजच मनात विचार आला… आज तीन वर्षांचा करार/लीज सेवाकार्यकाल संपतो आहे, उद्यापासून पुन्हा नूमवि.
वियोग आणि विरहाच्या त्या कल्पनेनं नानांच्या पितृतुल्य भावनांनी परिसीमा गाठली होती. ती होती हृदयाला भेदणाऱ्या संस्मरणीय अविस्मरणीय आठवणींची गोळाबेरीज. त्यामुळेच तर ते मुठभर काळीज गलबललं होतं, डोळ्यांत उतरलं होतं. सागरातील एका भव्य गलबतासारखं ते हेलकावे खात होतं. जसा जहाजाला कप्तान तसा शाळेला मुख्याध्यापक अन् महाविद्यालयाला प्राचार्य. निभावलं तर उत्तम होतं नानांनी, अगदी मनासारखं, पुणेकरांनीच काय तर तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनीही गौरवलंही होतं.
शिक्षण प्रसारक मंडळींचे केवढे उपकार आहेत या आयुष्यावर. पात्रता होतीच, तरीपण केवळ किर्ती ऐकून लाखमोलाची संधी बहाल केली त्यांनी. इंग्लंडात असतानाच शि.प्र. च्या आजीव सदस्यत्वाचं पत्र सन्मानपूर्वक दिलं होतं. नूमवि च्या अधिक्षक पदाची माळ गळ्यात घालून केवढा विश्वास दाखवला त्यांनी. त्या अपूर्व संधीचं सोनं तर झालंच होतं, मात्र शि. प्र. च्या ऋणातून उतराई होणं केवळ अशक्य.
दोन तपं उलटली. मी कुठे कमी तर पडलो नाही ना? नाहीच,
पण काहीतरी करायचं राहून गेलंय हे नक्की. आता योग्य वेळ आली आहे शि. प्र. चा निरोप घेण्याची, अन्यथा हा मोह भविष्यात सुटणार नाही. डोळ्यांत आलेली टिपं टिपित नानांनीच स्वतःला सावरलं अन् ते जवळच असलेल्या दगडी पारावर स्थिरावले.
सुमारे दोन तास महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षाबाहेर पायरीवर उभं राहून नानांच्या हालचालींतून त्यांच्या मनातल्या भावना टिपणाऱ्या सखारामाने धावत जाऊन नानांच्या हाती तांब्या फुलपात्रं दिलं आणि स्वतःच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा कोरड्या केल्या.
पाण्याचा घोट घेत नानांनी विचारलं, “काय रे सखारामा, इतकं काय झालं ओशाळायला?”
“लय पिरेम केलं साहेब तुम्ही आमच्यावर, या कालेजवर, पोरांवर, या झाडाझुडपांवर. तुमच्यासारख्या थोर माणसाची सेवा करायला मिळाली, भाग्य उजळलं आमचं. पर उद्यापासून तुम्ही नाय या इचारानं काळजाचं पाणी झालंय.”
“सखारामा, अरे ! माणसं येतील जातील, तू शि.प्र. मंडळीचा सेवक आहेस हे विसरु नकोस.”
“पर आमची बांधिलकी तर खुडचीबरुबर आसती ना साहेब.”
“खरं आहे तुझं ! श्रद्धा निष्ठा माणसाला आदर कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात.”
बोलणं सुरु असतानाच परडीत ओंजळभर फुलं घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱे भाऊ नानांच्या नजरेत भरले.
नानांनी घातलेली साद भाऊंच्या कानी गेलीच नाही.
भाऊ म्हणजे म्हणजे नानांचे तीर्थरुप/वडील, परशुराम सबनीस. सर्वच भावंडं त्यांना भाऊ म्हणत असत, म्हणजे परशुराम भाऊ. कॉलेजचं नावही सर परशुराम भाऊ महाविद्यालय.
मला तर वाटायचं नानांच्या वडलांचंच कॉलेजला नाव आहे की काय. पुढे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. न. म. जोशी सरांबरोबर झालेल्या संवादातून मला त्याचा उलगडा झाला. ते सर परशुराम भाऊ म्हणजे तत्कालीन जमखिंडी प्रांताचे शासक यांनी त्यांचे वडील ‘परशुरामभाऊ पटवर्धन’ यांचे स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या औदार्यपूर्ण भरीव आर्थिक देणगीतून महाविद्यालयाची भव्य इमारत उभी राहिली होती. त्यांच्या अट आणि आग्रहावरुन दिलेलं ते नाव. काय योगायोग असतात ना?
“सखारामा ! भाऊ रोज फुलं नेतात का रे?”
“हो, म्हणजे थोडंफार चालणं फिरणं आणि मग जाता-जाता चार दोन फुलं घेऊन जातात.”
“बोलला नाहीस कधी?”
“साहेब फुलंच ती, परकृतीचं देणं. नाही तोडली तर गळून पडत्यात, त्यापरीस देवाच्या पायाशी जात्यात ते बरं नाही का? आन कालेजच्या पोरी काय कमी तोडत्यात व्हय?”
“अरे पण ! झाडांना खतपाणी तर तू देतोस, त्यांची काळजी घेतोस. फुलं तोडण्याचा खरा अधिकार तर तुझा आहे, मग तू नेतोस की नाही कधी?”
“नाय जी, झाडावर पह्यलं तरी मन भरतं साहेब.”
“सखाराम ! कधीपासून चालू आहे हे?”
“रोजच असं नाही, फुलं असल्यावर येत्यात भाऊ कधीमधी.”
“मला सांग ! परडीभर फुलांचे मंडईत किती पडतात?”
“आण्याला पाटीभर तरी मिळत आसतील”, संखारमानं सहजच सांगून टाकलं.
“म्हणजे वर्षाला चार पाट्या तरी फुलं नेली भाऊंनी, होय ना?”
“आगदीच तसं नाय म्हणता येणार !”
खिशातून काही नाणी काढून सखारामाच्या हातात ठेवीत, “आपल्या कार्यालयातल्या मदतपेटीत टाक, कामी येतील. आणि उद्यापासून मी नाही म्हणजे भाऊ फुलं न्यायला येणार नाहीत, तेवढे समजदार आहेत ते.”
“राहुद्या ना साहेब ! भाऊ काय परके नाहीत.”
“तरीदेखील तुला तेच करावं लागेल, जे मी सांगितलंय, बरं झालं आजच कळलं, अन्यथा मोठा ठपका राहिला असता माझ्यावर.”
केवढी स्पष्टता, केवढी उदात्तता, केवढी ती मनाची सरलता तरलता. आजच्या मोफतच्या जमान्यातील माणसाला कदाचित हे वास्तव कपोलकल्पित वाटू शकेल. एका भल्या व्यक्तिनं सांगितलेला अनुभव म्हणून मी तो टिपलाय. चरित्रं अशीच घडत नसतात; त्यामागे मोठा कर्मयोग, ज्ञानयोग, गुणयोग, ध्यानयोग असतो. श्रीमद्भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात सुरुवातीच्या अभयं सत्वसंशुद्धि…. ते अभिजातस्य भारत।। या तीन श्लोकांत भगवंतांनी सुसंस्कृत पुरुषाची वीस लक्षणे (गुण) सांगितले आहेत. या गुणांनी युक्त असलेल्या नानांनी समाजात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता, पाऊलखुणा उमटवल्या होत्या. त्या पावलांचा मागोवा घेण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय हा केवढा योगायोग म्हणायचं…
त्याच दिवशी स.प. महाविद्यालयानं नानांना समारंभपूर्वक निरोप दिला. कौतुकाच्या राशी उधळल्या, काळजं गलबलली, हृदयाचे बांध फुटले, डोळे वाहिले, अश्रुंची फुले झाली.
‘इतकेच मला घेताना निरोप कळले होते, या ओंजळीतले त्या ओंजळीत वाण व्रताचे निथळत होते’ या न्यायाने सर्वांना धन्यवाद देत नानांनी स.प. चा भावपूर्ण निरोप घेतला…

विजय जोरी
©️प्रा.विजयकुमार तुकाराम जोरी
लोणावळा/तळेगाव/नारायणगाव/जांबूत

Leave a Comment