गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात वैज्ञानिक रांगोळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…!
डॉ.सी.व्ही.रामन यांनी 28 फेब्रुवारीला भौतिकशास्त्रातला महत्त्वाचा शोध लावला. या शोधाला 'रामन इफेक्ट’ असं म्हणतात. रामन यांनी 28 फेब्रुवारीला महत्त्वाचा शोध लावल्याने भारतात या दिवशी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' (National Science Day) साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या यामध्ये चेतासंस्था,गणितातील विविध संज्ञा, फुलांमधील पुंकेसर व स्त्रीकेसर,रसायनशास्त्रातील घटकांची व्याख्या,मानवी मूत्र प्रणाली तसेच गणितीय कोडी व विज्ञानातील विविध अविष्कार हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून काढले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश तंवर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या वैज्ञानिक रांगोळ्या शालेय परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षण ठरत आहे.पर्यवेक्षक संजय वलटे व विज्ञान विभाग प्रमुख नितीन पोखरकर यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख अरुण हिंगे,हनुमंत कदम व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

